सर्वोच्च न्यायालयाने सापाला शस्त्र मानून जामीन केला रद्द
जयपुर : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात 2018 मध्ये घडलेल्या एका घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या घटनेमध्ये प्रेम संबंधाचा आड येणाऱ्या सासूला सर्पदंशाच्या बनावाच्या माध्यमातून मारणाऱ्या सुनेला आणि तिच्या प्रियकराचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या घटनेमध्ये सापाचा शस्त्र म्हणून वापर केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. न्यायालयाने या घटनेचे वर्णन निर्घृण खून असेही केले आहे.
राजस्थानातील झुंजनू जिल्ह्यातील सागवा नावाच्या गावामध्ये 2018 मध्ये ही घटना घडली होती. या घटनेमध्ये सुनेने आपल्या सासूच्या खोलीमध्ये साप सोडला होता आणि खोली चारी बाजूंनी बंद केली होती. त्यापूर्वी सासूच्या तोंडावर उशी दाबून तिला बेशुद्ध केले होते. सासूचा मृत्यू झाल्यानंतर सुनेने एक सर्पमित्राला बोलून त्या सापाला पकडण्याचे आणि ठार मारण्याचेही काम केले. ही घटना नैसर्गिक मृत्यू मानण्यात आली होती पण तब्बल सात महिन्यांनंतर या घटनेचा भांडाफोड झाला.
दुसरी बाजू असेही सांगण्यात येत आहे की, सून आणि तिच्या प्रियकराने प्रथम गळा दाबून सासूचा खून केला आणि नंतर हा नैसर्गिक मृत्यू भासवण्यासाठी तिच्या खोलीमध्ये साप सोडला. या घटनेतील सुनेचे नाव अल्पना असून तिच्या प्रियकराचे नाव मनीष आहे. अल्पनाचा पती आसाममध्ये नोकरीला असतो. त्यामुळे मनिश आणि अल्पनाची मैत्री जमल्यावर त्याचे प्रेम संबंधात रूपांतर झाले.
हे प्रेम संबंध सासूला मान्य नसल्याने ती सतत सुनेला विरोध करत होती. प्रेमसंबंधातील सासूचा अडसर दूर करण्यासाठी अल्पना आणि मनीष यांनी तिची हत्या करण्याचे ठरवले. त्यासाठी मनिषने जयपूरच्या बाजारपेठेतून अतिशय विषारी सापाची खरेदी केली दोघांनी मिळून सासुच्या खोली तो साप सोडला दोघांनी सासूची गळा दाबून हत्या ही केली होती. फक्त नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी त्या खोलीत साप सोडण्यात आला, नंतर सर्पमित्राला बोलावून या सापाला ठार मारण्यात आले होते. त्यामुळे सगळ्यांनाच वाटले की सासू चा मृत्यू साप चावून झाला आहे.
स्थानिक न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या घटनेमध्ये सापाला सुद्धा शस्त्र म्हणून वापरले असा उल्लेख करून या दोघांचा जामीन रद्द केला आहे.