धानोरीतील आई व मुलाचा खून : आईचा मृतदेह सासवडला तर मुलाचा कात्रजला सापडला; रक्ताचे डाग असलेली गाडी मार्केटयार्ड जवळ

पुणे – नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेलजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करत महामार्गाच्या कडेला मृतदेह टाकून दिल्याचा  प्राथमिक अंदाज आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. आयान शेख (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्याच्या आईचा मृतदेह सासवड येथे सापडला. तीचाही खून करण्यात आला आहे.  आलिया आबिद शेख असे तीचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी सांगितले, की जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचे मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी मुलाचे शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्याचा खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, त्या मुलाचा खून करून त्या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत. तर मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक चारचाकी गाडी आढळून आली असून, त्या गाडीत रक्ताचे डाग असल्याचे समजते.

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील खळद येथे सासवड ते जेजुरी जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूस हॉटेल सूर्या च्या विरुद्ध दिशेला एका 35 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे. त्यानंतर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

या महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. या ठिकाणी देखील महिलेचा मृतदेह आणून टाकला आहे. याप्रकरणी सासवड पोलिस अधिक तपास करत आहेत. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक घोलप यांनी सांगितले,  दरम्यान या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे देखील पोलिस तपासून पहात असताना मुलाच्या आईची ओळख पटली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.