उत्तर आयर्लंडमध्ये हिंसाचारात पत्रकाराची हत्या

डेरी (इंग्लंड) – शुक्रवारी उत्तर आयर्लंडमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान झालेल्या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही लंडनडेरी भागातून दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक करण्यात आली आणि बेल्फास्ट येथे चौकशीसाठी नेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान लॉरा मॅक्‍गे या पत्रकार महिलेला गोळी लागली होती. हा हिंसाचार रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या “न्यू आयआरए पॅरामिलीटरी ग्रुप’ आणि पोलिसांदरम्यान झाला होता. उत्तर आयर्लंडमधील ग्रेगन इस्टेट भागात हा हिंसाचार झाला होता. यादरम्यान लॉरा मॅक्‍गे या पत्रकार युवतीला डोक्‍यात गोळी लागली होती. हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

या हिंसाचाराचे काही फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वाहने पेटवून देण्यात आली आणि जमाव पोलिसांच्या वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकत असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. या जमावामधील एका व्यक्‍तीने डेरी शहरातील रहिवासी भागावर गोळ्या झाडल्या. त्यापैकी एका गोळी लॉरा मॅक्‍गेला लागली असे पोलिस प्रमुख मार्क हॅमिल्टन यांनी सांगितले.

एकसंध आयर्लंडसाठी सुरू असलेल्या अहिंसात्मक प्रयत्नांना विरोध करणाऱ्या “न्यू आयआरए’ या हिंसक गटाने ही दंगल माजवली असल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केला आहे. या हिंसक आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रेगन भागात सशस्त्र पोलिस दलांना तैनात करण्यात आले आहे. या हिंसक आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ग्रेगन भागातील युवकांकडूनही तशीच हिंसक प्रतिक्रिया मिळण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.