पिरंगुट (पुणे) -पत्नीचे दुसऱ्याशी असलेले अनैतिक संबंधाचा बोभाटा होऊ नये सख्ख्या भावाचा खून करून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला. दहा दिवसांपूर्वी केलेल्या खूनाची घटना रविवारीउघडकीस आली. हा प्रकार कुळे (ता. मुळशी) येथील एका फार्म हाऊसवर घडला.
धक्कादायक बाब म्हणजे अनैतिक संबंध असलेल्या युवकालाच बरोबर घेऊन भावाने आणि पत्नीच्या सहाय्याने हा खून केला. या घटनेत संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40, रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांचा खून झाला आहे. याप्रकरणी स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38), विजयकुमार नारायण राठोड (वय 44) (तिघेही रा. कुळे) यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रसाद कुलकर्णी (वय 45, रा. सदाशिव पेठ पुणे) यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुुसार, कुळे (ता. मुळशी) येथे प्रसाद कुलकर्णी यांचे फार्महाऊस आहे. येथे स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार हे तिघेजण केअरटेकर म्हणून काम करत होते. अमृता आणि विजयकुमार यांच्यातील अनैतिक संबंधाची स्वामीनाथलाही त्याची खबर होती. स्वामीनाथचा भाऊ संतोष हे दिवाळीच्या दरम्यान अक्कलकोटहून कुळ्याला भावाकडे आले होते. त्यावेळी त्यांना अमृता आणि विजय यांच्यामधील अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. संतोषने अमृताला भावाचा संसार उघड्यावर आणू नको, अशी विनंती केली होती. दरम्यान संतोष गावी गेल्यानंतर बायकोच्या अनैतिक संबंधाची माहिती नातेवाईक, ग्रामस्थांना देईल; अशी भीती स्वामीनाथला होती. त्यामुळे स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार या तिघांनी संगनमताने शुक्रवारी (दि. 13) धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री संतोषला ठार मारले. फार्महाऊसच्याच एका बाजूला खड्डा खणून त्यात संतोषचा मृतदेह पुरला.
दोन दिवसांपूर्वी प्रसाद कुलकर्णी पुण्याहून फार्महाऊसकडे आले होते. त्यावेळी त्यांनी संतोषची चौकशी असता स्वामीनाथ, अमृता, मुले यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्याचवेळी कुलकर्णी यांना संशय आला. रविवारी (दि. 22) कुलकर्णी फार्महाऊसला असता त्यांनी शेताभोवती चक्कर मारली. त्यावेळी शेताच्या एका कोपऱ्यात त्यांना दुर्गंधी आली. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेऊन खरं काय आहे, याची माहिती घेतली. त्यावेळी तिघांनीही संतोषचा खून करून त्याचा मृतदेह फार्महाऊसच्या कोपऱ्यात पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते तपास करीत आहेत.