कराड -गोळेश्वर, ता. कराड येथे नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतातील पाचोळ्यात 13 जुलै रोजी पुरुषाचा सडलेला मृतदेह सापडला होता. तो मृतदेह इस्माईल शताबुद्धीन शेख (वय 25, मूळ रा. बालुग्राम, ता. राधानगरी, जि. साहबगंज, झारखंड) याचा असल्याचे स्पष्ट झाले होते.
कराड शहर पोलिसांनी या घटनेची उकल केली असुन जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी मोहम्मद सेटू आलम हिजाबुल शेख (वय 23, रा. इर्शादटोला, ता. राजमहल, जि. साहेबगंज, झारखंड) या सेंट्रिंग कामगाराने इस्माईल शेखचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माहिती दिली. 13 जुलै रोजी गोळेश्वर येथे शेतात सापडलेला मृतदेह मूळचा झारखंडचा रहिवासी इस्माईल शेखचा असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील संशयित शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. कराड शहर पोलिसांनी वेगाने तपास करून संशयिताला झारखंड राज्यातून पकडून आणले. चौकशीत संशयिताने खुनाची कबुली दिली. जुगारात हरलेल्या पैशाच्या रागातून इस्माईलचा चाकूने वार करून खून केला आणि त्याच्याकडील नऊ हजार 500 रुपये काढून घेतल्याचे संशयिताने सांगितले. घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंमध्ये चांदीची तुटलेली साखळी होती.
त्या साखळीच्या आधारे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सपोनि विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम. एम. खान, संदीप पाटील, जयसिंग राजगे, नितीन येळवे, संजय जाधव, मारुती लाटणे, प्रफुल गाडे, शंकर गडांकुश यांनी झारखंडमध्ये जाऊन मोहम्मद सेटू आलम हिजाबुल शेख याला पकडले. त्याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि विजय गोडसे तपास करत आहेत.