लखनौ – तबलिगी जमातमुळे देशात करोनाचा फैलाव झाल्याचा आरोप करणाऱ्या 26 वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये करेली भागात आपल्या घराबाहेर उभा असताना काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी या युवकावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये हा युवक जागीच मरण पावला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या हत्येला जबाबदार असलेल्यांवर राष्ट्रीय स्रुरक्षा कायद्याखाली कठोर आरोप लावण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. हत्या झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही आदित्यनाथ यांनी केली आहे.
हत्या झालेल्या युवकाने एका छोट्याशा गटातल्या लोकांशी बोलताना देशात करोना विषाणू पसरवण्यासाठी एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना तसेच तबलिगी जमातला दोषी ठरवले होते. या गटातील एकजण तेथून निघून गेला आणि काही जणांना बरोबर घेऊन परत आला. त्यानंतर थोड्याच वेळात या युवकाची हत्या झाली, असे प्रयागराजचे परिमंडळ अधिकारी अमित श्रीवास्तव यांनी सांगितले.