पुणे : गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.
प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार शिंदे (वय ५५, रा. लोणीकंद) अशी खून झालेल्या वडिल मुलाचे नाव आहे. ही दुहेरी खुनाची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास लोणीकंद मराठी शाळेपासून शिंदे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती. सुमारे ३ महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता.
आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या मागच्या बाजूला सनी व त्याचे वडील असे दोघे चारचाकी गाडीतून निघाले होते. त्यावेळी ५ ते ६ जणांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडिल कुमार हे मुलाला वाचविण्यासाठी धावले.
त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.