पुण्यात चेष्टा मस्करीतून सकाळी-सकाळी मध्यवस्तीत तरुणाचा खून

पुणे : चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका  तरुणाने चाकूने आपल्या मित्रावर वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करून  त्याचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली.

अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर सी एम गुजराथी शाळेसमोरील फुटपाथवर आज सकाळी  पावणे सहा वाजता हा प्रकार घडला. चेतन सुनील पवार (वय. 18) असे आरोपीचे नाव असून फरासखाना पोलिसांनी  त्याच्यासह  दोघांना ताब्यात घेतले आहे.  दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती.   तसेच दीड महिन्यापूर्वी स्वारगेट परिसरात झालेल्या भांडणाचा राग देखील मनात होता. आज सकाळी ते कचरा गोळा करण्यासाठी पुन्हा आर सी एम गुजराथी शाळेसमोर आले होते.

येथील फुटपाथवर त्यांच्यात  पुन्हा वाद झाला. त्यावेळी पवार  याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर तो स्वत:च रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस चौकीत पोहचला. चाकूसह आलेल्या आरोपीला पाहून पोलिसांची धांदल उडाली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक मृतदेह पडलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.