पिंपरी- दोरीने गळा आवळून एका तरुणाचा खून करण्यात आला. मात्र मयत व्यक्तीने आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना रहाटणी येथे शनिवारी (दि. ९) दुपारी घडली.
विजय रामदास वखरे (वय २८, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय याचे शुक्रवारी आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणामध्ये त्याचा भाऊ गणेश आणि वडील रामदास यांनी मध्यस्थी केली. यामुळे संतापलेल्या विजयने वडिलांच्या हाताला चावा घेतला. तसेच भावावर चाकूने वार केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज (शनिवारी) दुपारी विजय आणि गणेश यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. त्यावेळी विजय याने स्वतःचा दोरीने गळा आवळून घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे भाऊ गणेश वखरे याने पोलिसांना सांगितले. मात्र ही आत्महत्या नसून खून झाला असावा असा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पुढील कारवाई केली जाईल असे वाकड पोलिसांनी सांगितले.