पुणे : वानवडी परिसरातील वाडकर मळा लक्ष्मी पार्क येथील निर्जनस्थळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा दगडाच्या थडग्यात झाकून ठेवलेला मृतदेह मिळून आला आहे. तरुणाचा दगडाने ठेचून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा खून इतर ठिकाणी करून मृतदेह या ठिकाणी टाकून दिल्याची शक्यता आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन दिवसापूर्वी मृतदेह लपवून ठेवल्याची शक्यता आहे. यामुळे तो कुजून दुर्गंधी पसरली होती. परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच वानवडी पोलिसानी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही.
याबाबत बोलताना वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले, की शुक्रवारी सायंकाळी वाडकर मळा लक्ष्मी पार्क येथील निर्जनस्थळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार नागरिकांनी सांगितल्यामुळे समोर आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असलेले त्याची ओळख पटली नाही, मृतदेहाच्या अंगावरती जीन्सची पॅंट, अंगावर निळा चौकटी शर्ट, सावळा वर्ण, उंची पाच फूट पाच इंच, पायामध्ये स्पोर्ट शूज असे वर्णन आहे, याबाबतची माहिती कोणाला असेल तर त्यांनी वानवडी पोलीस ठाणे संपर्क करावा, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.