Pimpri । लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्या महिलेचा खून

पिंपरी, – लिव्ह इन रिलेशनमधील महिलेचा खून करण्यात आला. तसेच तिच्या मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले. खंबाटकी घाटात महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात प्रियकराला अटक केली. ही घटना वाकड येथे घडली.
जयश्री विनय मोरे (वय २७, रा. ॲड्रेस टॉवर, मारूंजी, ता. मुळशी, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा प्रियकर दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. मु. बहुर, पो. करूंज, ता. मावळ, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि जयश्री गेल्या पाच वर्षांपासून वाकडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. दिनेशच लग्न झालेले असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. जयश्रीचा सात वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. मात्र ती पतीसोबत राहत नव्हती. जयश्री आणि दिनेशचे काही दिवसांपासून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत होती.
२४ नोव्हेंबर रोजी भूमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. जयश्रीचा काही वेळातच मृत्यू झाला. दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साताऱ्यातील खंबाटी घाट शोधला आणि त्या ठिकाणी जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी- चिंचवडमध्ये आला. २५ नोव्हेंबर रोजी जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचे निष्पन्न झाले. दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल केली होती. अखेर या घटने प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.





