चाफळ -एकतर्फी प्रेमातून चाफळ, ता. पाटण येथे चैतन्या बाळू भंडलकर (वय 16, सध्या रा. चाफळ, मूळ रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) हिचा अनिकेत अरविंद मोरे (वय20, रा. शिरंबे, ता. कोरेगाव) याने भरदिवसा घरात घुसून, चाकूने गळ्यावर व शरीरावर वार करून निर्घृण खून केला.
ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे चाफळसह तालुक्यात खळबळ उडाली. युवतीचा खून केल्यानंतर संशयित स्वत:हून चाफळ पोलीस दूरक्षेत्रात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चाहूरवाडी (नाणेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नंदा भंडलकर या कुटुंबीयांसमवेत चाफळ येथे भाड्याच्या घरात राहतात.
त्यांना चैतन्या (वय 16) व अनन्या (वय 5) या मुली आहेत. नंदा भंडलकर या अनन्याला घेऊन गुरुवारी शाळेत गेल्या होत्या, तर त्यांचे पती मूळ गावी वाठार किरोलीला गेले होते. चैतन्या घरात एकटीच होती. त्यावेळी संशयित अनिकेत तिच्या घरात घुसला. त्याने चाकूने चैतन्याचा गळा चिरून शरीरावर वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळातच संशयित स्वत:हून चाफळ पोलीस दूरक्षेत्रात हजर झाला. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. ती ऐकून पोलीसही सुन्न झाले. संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, चैतन्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर, उपनिरीक्षक अजित पाटील यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.
या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलीस ठाण्यात सुरू असल्याने अधिकचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, चाफळ हे राज्याच्या नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. चाफळच्या इतिहासात खुनाची ही पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली आहे. ऐन सुगीच्या दिवसांत लोकांनी हातातील कामे सोडून घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती.
…तर माझी बहीण वाचली असती
संशयित युवक भंडलकर कुटुंबाला नेहमीच त्रास देत होता. चैतन्याच्या चुलत भावाने त्याला चार महिन्यांपूर्वी समज दिली होती. त्याच वेळी त्याचा बंदोबस्त केला असता, तर आज माझी बहीण वाचली असती, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.