वसई – आईला दारूचे व्यसन असल्याच्या कारणावरुन १८ वर्षीय मुलाने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार वसईतील कोळीवाडा परिसरातील घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपासास सुरवात केली आहे.
वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये १८ वर्षीय आरोपी तरुण आपल्या ५९वर्षीय आईसोबत वास्तव्याला आहे. मागील बऱ्याच काळापासून मृत महिला दारूच्या आहारी गेली होती. आपली आई सतत दारुच्या नशेत असते, ही बाब १८ वर्षीय मुलाला सतत खटकत होती. यावरुन यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मृत महिला दारुच्या नशेत होती. यामुळे मायलेकामध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली.