पुणे – कोंढव्यात एका सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून खून करण्यात आला. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेने कोंढवा परिसरात खळबळ माजली आहे. त्याच्यावर तब्बल 8 ते 10 गुन्हे दाखल होते.
घनशाम उर्फ पप्पू पडवळ (रा.कोंढवा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. यानंतर त्याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरु केला. एका गॅंगकडून त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न मध्यंतरी झाला होता. यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. दरम्यान आज त्याच्या घरात अज्ञात व्यक्तींनी घुसून कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही माहिती कोंढवा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थली दाखल झाले. पोलिसांनी पडवळचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांकडून केला जात आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पडवळ हा एकटाच कोंढवा येथील सदनिकेत रहात होता. त्याचे नातेवाईक फोनवरुन त्याच्या संपर्कात असायचे. आज त्याने फोन न उचलल्याने नातेवाईत त्याच्या घरी दाखल झाले. दरवाजा आतून बंद होता, आवाज देऊनही दरवाजा उघडला गेला नाही. यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा पडवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्यांच्यावर शहरात 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत. मात्र 2014 नंतर त्याच्यावर अद्याप एकही गुन्हा नव्याने दाखल झाला नव्हता.