पुणे – इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडी परिसरात घडली.
यात हल्लेखोर तरुणाने तिचे शीर धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत इतर दोन साथीदारही होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हे कृत्य मुलीच्या नात्यातील तरुणाने केल्याची माहिती समोर आली आहे. क्षीतिजा अनंत व्यवहारे असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, शुभम भागवत असे संशयिताचे नाव आहे.
क्षीतिजा ही कबड्डीपटू होती. ती यश लॉल् परिसरात मंगळवारी सायंकाळी मैत्रिणींसोबत कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी तेथे आलेल्या शुभमने तिला बाजूला घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले.
दरम्यान, आरोपीने कोयत्याने क्षीतिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. सोबतच्या दोघांनीही त्याला साथ दिली. यानंतर त्याने कोयता टाकून पळ काढला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही मिनिटांपूर्वीच पोलिसांची गाडी तेथून गेली
या परिसरात लहान मुलांचे खेळांचे क्लास चालतात. तसेच नागरिक तेथे फिरावयास येतात. घटनेच्या काही मिनिटे आधी पोलिसांची गस्त घालणारी गाडी तेथून निघून गेली होती. लहान मुलांसमोरच हा निर्घृण खून करण्यात आला.
यामुळे तेथील मुलांना व नागरिकांना मोठा धक्का बसला. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट देउन तपासाच्या सूचना दिल्या. बिबवेवाडी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
अतिशय भयानक; काय चाललंय पुण्यात – चित्रा वाघ
या घटनेवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय भयानक असून, कोयत्याने वार करून खून हे टाइप करतानाही अंगावर काटा येतोय. काय भोगले असेल तिने अशा शब्दांत वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आरोपी शुभम भागवत (सुखसागरनगर) हा मुलीच्या नात्यातील आहे. त्याला मुलीच्या घरच्यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी समज दिली होती. दरम्यान, क्षीतिजा तिच्या पाच मैत्रिणींसोबत कबड्डीची प्रॅक्टिस करत होती. शुभम तेथे दोघा मित्रांसोबत आला. यानंतर त्याने कोयता व चाकूने तिच्या मानेवर वार केले. घटना घडली तेव्हा तिच्या मैत्रिणी सोबत होत्या. थोड्याच अंतरावर काही घरे आहेत. मात्र, तिला काहीच मदत मिळू शकली नाही.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त