लखनऊ – चारित्र्यावर संशय घेतल्याने विषारी औषध पाजून अडीच वर्षीय चिमुकल्याचा खून करून नंतर स्वत: वीष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगरमध्ये घडली. सोनम (25) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती आकाश पत्नी सोनमच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे सोनम तणावात होती. अनेकदा ती माहेरी निघून जात असे. तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. बुधवारी सकाळी पती आकाश शेतातून घरी आला असता चिमुकला मृत्यूमुखी पडल्याचे आणि पत्नी सोनम बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आले. तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनमचा जीव वाचला मात्र चिमुकला रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू पावला होता.
दरम्यान, मुलाच्या खूनप्रकरणी सोनमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पती, सासू , सासरे यांची चौकशी सुरु आहे. पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्याचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.