बारामती/ जळोची – बारामती एमआयडीसीतील रुई परिसरात सख्ख्या मावस भावावर वार करीत त्याचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार भरदिवसा घडल्याने बारामती शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. गजानन पवार (वय 28,मुळ रा.वसमत,जि.हिंगोली,सध्या रूई बारामती)असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.
सोमवारी (दि.1) दुपारी बाराच्या सुमारास रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस गजानन वास्तव्यास आहे. घरातच त्याची हत्या करण्यात आली. गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबत सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या करण्यात आलेल्या युवकावर पोलिसांनी केलेल्या पाहणीत 38 वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एवढी भयानक पद्धतीने झालेली हत्या पाहून पोलीस चक्रावले.
पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गजानन हा केशकर्तनालयात काम करतो. त्याच्याबरोबर त्याचा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा. वसमत, जि.हिंगोली) हा देखील काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो सतत नशेत असतो, अशी माहिती मिळाली.पोलिसांनी शोध घेताना संतोष सीसीटीव्ही फुटेजमध्ये येथून जाताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने बारामती बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी पथक पाठवत संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबविली. पोलीस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे आदींच्या पथकाने संतोषला झडप घालत पकडले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात सख्ख्या मावस भावाचा केवळ राग म्हणून खून केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.