तिहेरी हत्याकांडाने बीड हादरले

मित्राच्या मदतीने तरुणाने स्वत:च्याच 3 सख्ख्या भावांना संपवले

बीड – सख्या भावाने मित्रांच्या मदतीने आपल्या तीन सख्ख्या भावांचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि त्यातूनच हे हत्याकांड घडले आहे. किरण काशीनाथ पवणे, प्रकाश काशीनाथ पवणे, दिलीप काशीनाथ पवणे अशी मृतांची नावे आहेत.

ही घटना बीड शहराजवळील पिंपरगव्हाण रोडवरील गिराम तरफ भागात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भावा-भावांमधील शेतीच्या भांडणात लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. या भांडणात तिघा जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहे.
बीडमधील वासनवाडी येथे राहण्याऱ्या किसन पवणे आणि काशीनाथ पवणे या भावांमध्ये 10 एकर शेत जमिनीचा वाद सुरू होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र याबाबतीत शुक्रवारी रात्रीच ऍड. कल्पेश किसन पवणे व डॉ. सचिन किसन पवणे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.

मात्र आता या दोघांवरच खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये कळते. एक दिवस अगोदर तक्रार देवून या दोघांनी पूर्व नियोजित कट तर नाही ना घडवला, असाही संशय व्यक्त केला जात आहे. कल्पेश आणि सचिन हे दोघेदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पोलीस निगराणीखाली उपचार सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील किसन पवणे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली. मात्र या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. या घटनेमुळे फक्त जमीनीच्या तुकड्यासाठी सख्खा भाऊ पक्का वैरी कसा होते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकाच कुटुंबातील तीन तरुणांनी आपला जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)