77 वर्षीय पतीकडून खुनानंतर आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठूी
फरार इसमाचा पोलिसांकडून शोध सुरू
प्रभात वृत्तसेवा
पुणे- आजारी पत्नीचा संभाळ करून शकत नसल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने तिचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर सोबत एक चिठ्ठी लिहून स्वत: आत्महत्या करायला निघून गेला. संबंधित आरोपीचा वानवडी पोलीस शोध घेत आहेत.
देविंदर कौर बिंद्रा (66, रा. फ्लॉवर व्हॅली, लोटस बिल्डींग सोसायटी, वानवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हरविंदर सिंग बिंद्रा (77) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग बिंद्रा यांचा मुलगा रमेंद्रसिंग यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना देविंदर कौर बिंद्रा या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मुलाकडे चौकशी केली असता, त्याने वडिल हरविंदर यांनी देविंदर यांची देखभाल करणे शक्य नसल्याने त्यांचा चाकूने गळा चिरून खून केला असल्याचे सांगितले. त्यांनी खून केल्यानंतर जवळ एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये “पत्नीची देखभाल करणे शक्य नसल्यामुळे चाकूने गळा चिरून खून करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, मी स्वत: हा खून केला असून इतर कोणालाही जबाबदार धरू नये. यानंतर मी सुध्दा आत्महत्या करणार आहे’, असे लिहले आहे. पोलिसांनी तातडीने एक पथक तयार करून हरविंदर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.