पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या वकिलांनी बुधवारी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली. पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. साक्ष नोंदणी तसेच उलटतपासणीला सुरूवात होणार आहे. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
याप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित्त करण्यात आले. त्यानंतर सीबीआयने पुराव्यांची यादी सादर केली होती.
सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. त्यातील इन्क्वेस्ट पंचनामा आणि डॉ. दाभोलकर पुण्यात आल्यानंतर घटनेपूर्वी जेथे राहिले, त्या सदनिकेची झडती घेतली तेव्हा उपस्थित असलेल्यांची साक्ष 29 ऑक्टोबर रोजी नोंदविली जाणार आहे.
तत्पूर्वी आरोपीचे वकील सुवर्णा आव्हाड- वस्त यांनी डॉ. दाभोलकर यांच्या शवविच्छेदन सीडी, एक्स-रे, घटनास्थळ आणि मृतदेहाचे छायाचित्रे आदींची मागणी केली. त्यावर न्यायालयाने हे साहित्य ई-मेल अथवा प्रत्यक्ष आठ दिवसांत आव्हाड यांना द्यावे, अशी सूचना सीबीआयला केली. औरंगाबाद कारागृहात असलेला आरोपी सचिन अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहातील शरद कळसकर यांना येरवडा कारागृहात नेण्यात आले आहे.
बुधवारी डॉ. तावडे, अंदूरे आणि कळसकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजेरी लावली. तर, विक्रम भावे प्रत्यक्ष हजर होता. मात्र, यापुढील सुनावणीला आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. आरोपींशी संवाद साधायचा आहे. थोडा अवधी द्यावा अशी मागणी वकील सुवर्णा आव्हाड यांनी केली होती.
नोव्हेंबरमध्ये प्रत्येक शनिवारी होणार सुनावणी
पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्येक शनिवारी म्हणजे, दि. 13, 20 आणि 27 रोजी सुनावणी होणार तसेच डिसेंबरमध्ये दि. 4, 11, 18 रोजी सुनावणी होणार आहे. यादरम्यान साक्षनोंदणी आणि आरोपींच्या वकिलांकडून उलटतपासणी होणार आहे. तसेच सुनावणीच्या दिवशी केवळ डॉ. दाभोलकर खटल्यावरच कामकाज चालणार असेही न्यायालयाने स्पष्ट केले.