नगर | पत्नीचा गळा आवळून खून

एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा

नगर (प्रतिनिधी) – अमरावती जिल्ह्यातून नगर शहरात मजुरी काम करण्यासाठी आलेल्या पती-पत्नीचे वाद झाले. त्या वादात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. लता संतोष पटोरकर (रा. बिबामल ता. धानोरी जि. अमरावती) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

या प्रकरणी पती संतोष परसराम पटोरकर (वय 28 रा. बिबामल ता. धानोरी जि. अमरावती) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागीनाथ सुर्यभान कराळे (रा. वडगाव गुप्ता, नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली.

फिर्यादी गवंडी काम करत असल्याने त्यांच्याकडे हाताखाली मजुर असतात. शुक्रवारी (दि.2) फिर्यादी यांच्याकडे संतोष पटोरकर, त्याची पत्नी लता व त्यांची एक छोटी मुलगी आली होती. त्यांना कामाची गरज असल्याने फिर्यादी यांनी त्यांना कामावर ठेऊन घेतले होते. शुक्रवारी त्यांनी फिर्यादी यांच्याकडे तपोवन रोडवरील बांगडीवाला हाऊस येथे काम केले. 

सुरूवातीला फिर्यादी यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था बांगडीवाला हाऊस येथे केली होती. त्यानंतर फिर्यादी यांची बहिण अनिता संजय कुलट राहत असलेल्या एमआयडीसी परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. रविवारी सकाळी लता झोपेतून उठली नसल्याने फिर्यादी यांची बहिण अनिता यांनी फिर्यादी यांना कळविले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संतोष याने लताचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.