अनैतिक संबंधातून तरुणीचे अपहरण करून खून

  • 24 तासांत प्रियकरासह दोघेजण जेरबंद
  • आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी


देहूरोड  – 
किवळे येथील रहिवासी असलेल्या वीस वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने अपहरण करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुनाचा प्रकार उजेडात येताच देहूरोड पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.

प्रिया शिलामन चव्हाण (वय 20, रा. आदर्शनगर, किवळे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, प्रशांत सूर्यकांत गायकवाड (वय 31, रा. आंबेडकरनगर, किवळे) व त्याचा साथीदार विक्रम राजाराम रोकडे (वय 33, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मयत तरुणीच्या बहिणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रिया हिचे आरोपी प्रशांत याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधातून प्रिया हिला सहा महिन्यांची मुलगीही झाली होती. प्रिया ही आदर्शनगर येथे रहात होती तर आरोपी प्रशांत हा विवाहित असून तो पत्नीसह रहात होता. प्रशांत शुक्रवारी रात्री (दि. 25) प्रियाच्या घरी आला होता. त्याने मुलीचे संगोपन व घरखर्चाच्या कारणावरून प्रियासोबत भांडण केले. यानंतर मुलीला घरात ठेवून प्रियाचे जबरदस्तीने अपहरण करून तो तिला घेऊन गेला. सकाळपर्यंत प्रिया घरी न आल्यामुळे शनिवारी (दि. 26) तिच्या बहिणीने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच देहूरोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ हालचाली करत प्रियाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या वेळी आदर्शनगर (किवळे) येथील दगड खाणीमध्ये तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. खुनाची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रशांत व त्याला खुनामध्ये साथ देणाऱ्या विक्रम रोकडे याला चिंचवडमधील डांगे चौकातून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी या वेळी पळून जाण्याच्या तयारीत होते. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याची पोलिसांनी सांगितले. प्रिया आणि प्रशांत यांच्यात खर्चा वरून तसेच बाळाचे संगोपन करण्यावरून सातत्याने वाद होत होते. प्रिया या विषयावरून प्रशांतच्या घरी जाऊन वाद करत होती. यामुळे वैतागलेल्या प्रशांतने आरोपी विक्रमच्या मदतीने प्रियाचे अपहरण करून तिला आदर्शनगर येथील सुनसान ठिकाणी नेले. या ठिकाणी तिचा गळा आवळून खून केला व नंतर दगडाने मारहाण केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खाणीत टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना न्यायालयासमोर सादर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.