शिरूर : रांजणगाव गणपती येथील वेअर हाऊस मधील परप्रांतीय सुरक्षारक्षकाच्या बँक अकाउंट वर असणारी मोठी रक्कम काढण्यासाठी त्याचे अपहरण करून यास विरोध केल्याने त्याचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघड झाली असून, या खुनातील 3 आरोपींना 24 तासाच्या आत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या पथकाने जेरबंद केले आहे.
रामआसरे लालमन मिश्रा (वय वर्षे ५५ मुळगाव उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याबाबत मिश्रा काम करत असलेल्या सिक्युरिटी एजन्सी चे सुपरवायझर खंडू काळु बोऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे.
सूत्रधार लक्ष्मण शिंदे (वय वर्ष २० शिरसगाव काटा) , विकास बाळासाहेब जगताप (वय वर्षे २१, कोहकडे वाडी,न्हावरा) कमलेश भीमराव पवार (वय वर्ष 21 निर्वी, तिघे तालुका शिरूर) या तिघांनी खुनाची कबुली दिली असून या तिघांना रांजणगाव गणपती पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव औद्योगिक परिसरातील एका प्लॉट नंबर ई 36 वेअरहाऊस मधून 18 जुलै सकाळी 7 वाजण्याच्या अगोदर वेअरहाऊसच्या सेक्युरिटी गार्ड रामआसरे लालमन मिश्रा (वय वर्षे ५५ मुळगाव उत्तर प्रदेश) यांचे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण केल्याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला होता . त्यानुसार घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जोरदार फिरवत गुप्त माहितीच्या आधारे सूत्रधार शिंदे, विकास जगताप, कमलेश पवार या तीन व्यक्तींना शिताफीने ताब्यात घेतले होते.
त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सिक्युरिटी गार्ड चे अपहरण केल्याचे कबूल केले तर सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटवर मोठी रक्कम असल्याची माहिती त्यानुसार आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्या एटीएम मधून पैसे काढून घेण्याचा प्लॅन आखला होता. परंतु मिश्रा यांने एटीएम मधून पैसे काढून देण्यास विरोध केल्याने आरोपींनी त्याला जीवे मारून टाकले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह पारगाव ता. दौंड येथील पुलावरून भीमा नदीत पाञात टाकून दिला होता.
रांजणगाव पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह टाकलेल्या अंतरापासून तपास घेतला असता पुढील 7किलोमीटर अंतरावर वडगाव रासाई ता.शिरूर गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात मृतदेह आढळून आला.
याबाबत रांजणगाव पोलिसात आरोपींविरोधात अपहरण आणि खूनचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे
सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस कर्मचारी तुषार पंदारे, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, चंद्रकांत काळे, किशोर तेलंग, प्रफुल्ल भगत, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल चव्हाण, मिलिंद देवरे, उद्धव भालेराव, अमोल नलगे, विजय शिंदे या पोलिस पथकाने या गुन्ह्याचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. पुढील तपास रांजणगाव पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहे .