फलटण – जेवणाच्या वेळी झालेल्या शिवीगाळीच्या रागातून सासऱ्याने सुनेचा चाकुने वार करुन खून केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी (ता. फलटण) येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहराजवळील उपनगर असलेल्या जाधववाडी येथे पवार कुटुंब वास्तव्यास आहे. रविवारी 11 रोजी रात्री आठच्या दरम्यान आम्रपाली शाम पवार (वय 23) हिचा सासरे चांडवल झबझब पवार (वय 50) याने जेवणावेळी झालेल्या वादातून व शिवीगाळीतून चिडून जाऊन चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी चांडवल यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे तोही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कविता चांडवल पवार (वय 45) हिने फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच चांडवल यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी मयत व इतर नातेवाईकांवर परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खून प्रकरणी संशयित असलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.