पुणे -सीसीटीव्हींची छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकालाच जीवे मारण्याचा प्रयत्न सराईत आरोपीने केला होता. त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. ही घटना 18 एप्रिल रोजी मंगळवार पेठेत घडली होती. हा आरोपी फरार होता.
प्रतीक पृथ्वीराज कांबळे (29) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार कुमार भागवत चव्हाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मंगळवार पेठेतील सार्वजनिक सीसीटीव्हींची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक नरेश वाडेवाले स्टाफसह आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तर, त्याचा साथीदार कुमार याने वीट फेकून मारली.
पोलिसांनी कुमार यास जागेवरच ताब्यात घेतले. मात्र, कांबळे फरार झाला होता. दरम्यान, कांबळे हा बुधवार पेठेत कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती अंमलदार योगेश जगताप यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कांबळे यास ताब्यात घेतले.ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, महेश बामगुडे यांनी केली.