बारामतीत उद्योजकाच्या खुनाचा कट

गुन्हे अन्वेषण पथकाने प्रकरण आणले उघडकीस : दोघांची पोलीस कोठडीत रवानगी

बारामती – बारामती तालुक्‍यातील बड्या उद्योजकासह त्यांचा वकील असलेल्या मावसभावाच्या खुनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि. 26) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा कट बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने उघडकीस आणला आहे. या घटनेने बारामतीत एकच खळबळ उडाली असून व्यावसायिक भागीदारातील मतभेद व भावकीतील जुन्या भांडणाच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मगरवाडीतील नवनाथ उद्योग समुहाचे प्रमुख संग्राम तानाजीराव सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) व त्यांचा मावसभाऊ ऍड. प्रसाद भगवानराव खारतुडे (रा. अशोकनगर, बारामती) यांच्या खुनाचा कट रचण्यात आला होता. तर, जयचंद संतोष जाधव (वय 20, रा. सोमेश्‍वरनगर, ता. बारामती) व सचिन कल्याण सोरटे (वय 40, रा. मगरवाडी, ता. बारामती) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. संग्राम सोरटे यांनीच बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संग्राम सोरटे यांचे बंधू प्रवीण व संगीता नाझीरकर यांचे अनेक व्यवसाय भागीदारीत होते. नाझीरकर या राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी आहेत. नाझीरकर हे सध्या नगरविकास खात्यात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. सोरटे व नाझीरकर कुटुंबात व्यावसायिक मतभेद झाले होते. तसेच, संग्राम सोरटे यांचे चुलत चुलते श्रीपाल आप्पासो सोरटे (रा. सोरटेवाडी) आणि सचिन व विकास सोरटे यांचेही दिवाणी स्वरुपाचे दावे बारामती न्यायालयात प्रलंबित आहेत. संग्राम सोरटे यांनी या प्रकरणात पुढाकार घेत खारतुडे यांच्या कार्यालयात तडजोडीचा प्रयत्न केला होता; परंतु, तो अयशस्वी ठरला. नाझीरकर व संग्राम सोरटे यांच्या भागीदारीत ट्रॅक्‍टर शोरुम, पशुखाद्य कारखाना, पोल्ट्री, डेअरी, दुचाकी शोरुम असे व्यवसाय होते; परंतु, मतभेद झाल्यावर पुढे दिवाणी दावे सुरू झाले होते.

बुधवारी (दि. 17) ऍड. प्रसाद खारतुडे यांना यासंबंधीचा सुगावा लागला. दोघा आरोपींनी संग्राम यांना रिव्हॉल्व्हरने तर प्रसाद यांना कोयता व तलवारीने मारण्याचा कट रचला होता. तर खारतुडे यांचा मेडद येथील शेतात जावून पाठलाग करण्यात आला होता. संग्राम सोरटे यांचा मगरवाडीतील बंगला, नवनाथ मिल्कचे कार्यालय, करंजेपूल येथील नवनाथ पतसंस्थेचे कार्यालय या ठिकाणी आरोपींनी रेकी (पाहणी) केली होती. या घटनेचा सुगावा लागताच सोरटे व खारतुडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. मीना यांनी बारामती गुन्हे शाखेला ही जबाबदारी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जयचंद याला ताब्यात घेताच या कटाचा उलगडा झाला. पोलिसांनी दोघा आरोपी विरोधात खूनाचा प्रयत्न, कट रचणे तसेच आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर पुढील तपास करीत आहेत.

वकिलांनी काम बंद ठेवत नोंदविला निषेध…
बारामती येथील बड्या उद्योजकासह त्यांच्या वकील असलेल्या मावस भावाच्या खुनाचा कट उघडकीस आल्याने बारामती न्यायालयातील वकिलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी वकिलांनी सोमवारी (दि. 23) काम बंद ठेवत आपला निषेध नोंदवला. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)