चेन्नई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित काही त्रास होत असल्यामुळे त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादसह चेन्नईमध्ये आहे. तो या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
18 एप्रिल रोजी संध्याकाळी मुरलीधरनला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या. त्यांतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती मिळाली आहे की, मुरलीधरनच्या हृदयात ब्लॉकेज आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या हृदयात एक स्टेंट टाकला जाईल. मुरलीधरन 17 एप्रिलला चेन्नई येथे खेळवण्यात आलेल्या हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावेळी मैदानात उपस्थित होता.
49 वर्षीय मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तो श्रीलंकेकडून 133 कसोटी आणि 350 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडेमध्ये 534 बळी घेतले आहेत. 2011 च्या विश्वचषकानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएलमध्येदेखील खेळला आहे.
मुरलीधरन चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये तो 66 सामने खेळला आहे. त्यात त्याने 63 बळी घेतले आहेत. 11 धावा देत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या तीन मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्ज या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने 40 बळी मिळवले आहेत. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रशिक्षक म्हणून रुजू झाला आहे.