Muralidhar Mohol | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत अनेक दिग्गज नेतेमंडळींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यातील भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये सहकुटुंब मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आज मतदानाचा हक्क बजावला, आपल्या घटनेनं दिलेला तो अधिकार आहे, तो बजावला पाहिजे, आम्ही तिघांनी मी पत्नी आणि माझ्या मुलीने मतदान केलं. गेली १० वर्ष केंद्रात मोदीजींचे सरकार आहे आणि अडीच वर्ष राज्यात महायुतीचे सरकार आहे, राज्याची जनता विकासाला प्राधान्य देते, राज्यात महायुतीचे सरकार येईल हे नक्की, मुख्यमंत्री महायुतीचे होतील.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या किती जागा येणार?
तसेच शहरातील सर्वच मतदान केंद्रावर नागरिकांचा प्रतिसाद पाहता गेल्या दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यातील गेल्या अडीच वर्षातील महायुतीचे सरकारने केलेल्या विकासकामांचा फायदा महायुतीला होणार,” असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात महायुती 45 ते 48 जागा जिंकेल असा मला विश्वास असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
‘लोकसभेनंतर यावेळेला देखील लीड घेऊ’
पुढे ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मला कोथरूडकरांनी 74 हजार 600 इतकं मताधिक्य दिलं होतं. यंदा देखील कोथरूडकर भाजपाला 75 हजार किंवा त्यापेक्षा अधिकच मताधिक्य देतील, कोथरूडकरांनी लोकसभेला 74 हजाराचं लीड दिलं होतं, यावेळेला देखील लीड घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले “विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे ते एका विधानसभा मतदारसंघात पैसे वाटायला का जातील? निवडणुकीत पराभव होणार असल्याचे समजल्यानंतर विरोधकांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु नागरिक सुज्ञ असून ते सर्व पाहत आहेत, असं मोहोळ म्हणाले.
हेही वाचा :