पुणे महापौरपदी मुरलीधर मोहोळ

सरस्वर्ती शेंडगेंची उपमहापौरपदी निवड

पुणे – महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली आले. मोहोळ हे शहराचे 57 वे महापौर असून पुणे महापालिकेचे भाजपचे पहिले पुरूष महापौर ठरले आहेत. तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली.

महापौरपदासाठी मोहोळ यांना 97 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. तर शेंडगे यांनाही 97 मते मिळाली. शेंडगे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार चांदबी नदाफ यांचा पराभव केला. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची विक्रमी सत्ता असल्याने मोहोळ आणि शेंडगे यांच्या अर्ज भरल्यानंतरच त्यांची निवड निश्‍चित होती. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारीक ठरली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यात कोणत्याच उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यात मोहोळ यांना 97 मते मिळाली तर, कदम यांना 59 मते मिळाली. त्यामुळे महापौरपदी मोहोळ यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उपमहापौरपदासाठी याच पद्धतीने झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सरस्वती शेंडगे यांना 97 मते मिळाली. तर कॉंग्रेस आघाडीच्या चांदबी नदाफ यांना 57 मते मिळाली. त्यामुळे शेंडगे या उपमहापौरपदी विजयी झाल्या. यावेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे पालिकेत येऊन अभिनंदन केले. या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात आले होते.

मनसे तटस्थ, शिवसेना आघाडीत
महापौरपदाच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र, त्यावेळी राज्यात शिवसेना आणि आघाडी एकत्र आल्याने त्याचे पड्‌साद महापालिकेतही उमटले. महापौर तसेच उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आपले मतदान आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार कदम आणि उपमहापौरपदाच्या उमेदवार चांदबी नदाफ यांना केले. दरम्यान, या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करताना, शिवसेनेने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. तसेच या पदासाठी अर्जही दाखल केलेला नव्हता. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिवसेनेने शुक्रवारी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने भविष्यात ही आघाडी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी पुन्हा येईनची घोषणाबाजी
या दोन्ही पदांसाठी झालेल्या मतदानावेळी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकमेकांना राजकीय चिमटे काढले. शिवसेनेचे माजी गटनेते संजय भोसले यांनी वारंवार “मी.. पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन’ म्हणत राहिल्याने शिवसेनेने आघाडीला मतदान केल्याचे सांगितले, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि दीपक पोटे यांनी मतदान करताना “मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन’ची घोषणा बाजी केली.

शहराच्या शास्वत विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी या शहराचा प्रथम नागरिकही असून पुणेकरांनी आपल्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या पक्षातून महापालिकेत शहर विकासासाठी पाठविले आहे. या पुणेकरांचा मान ठेवून सर्व पक्षांनासोबत घेऊन शहरातील प्रकल्पांना गती लावणे, तसेच शहराला जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देण्यास आपले प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन ही विकासाची प्रक्रिया आणखी गतीमान केली जाईल.

– मुरलीधर मोहोळ, नवनिर्वाचित महापौर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)