स्वच्छ सर्वेक्षण : लोकसहभागात पालिका देशात पाचवी
पुणे – केंद्रशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी आवश्यक असलेला लोकसहभाग मिळत नसल्याने मागील तीनही सर्वेक्षणात देशातील पहिल्या दहा शहरांत पुण्यास स्थान मिळवता आले नाही.
मात्र, यंदा स्पर्धा संपण्यास दहा दिवस शिल्लक असतानाच; लोकसहभागात पुणे पालिका देशात पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे उर्वरित पुणेकरांनी सर्वेक्षणासाठीच्या स्वच्छता ऍपच्या मध्यमातून अधिकाधिक “फिडबॅक’ द्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत जे शहर सहभागी होईल, तेथील सर्वसाधारणपणे शहराच्या लोकसंख्येच्या 1 टक्के नागरिकांनी हा “फिडबॅक’ देणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी पालिकेले पुण्याची लोकसंख्या 40 लाख गृहीत धरली आहे. त्यानुसार, पालिकेस 4 हजार नागरिकांच्या “फिडबॅक’ची आवश्यकता आहे.
आतापर्यंत शहरातील सुमारे 11 हजार नागरिकांनी आपला “फिडबॅक’ दिल्याने पुणे देशात पाचव्या क्रमांकावर आहे. तर “फिडबॅक’मध्ये तिरुपती, अहमदाबाद, हैदराबाद व विशाखापट्टणम, तर 6 क्रमांकावर सुरत व मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.
या सर्वेक्षणासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, स्पर्धा संपण्यास दहा दिवस शिल्लक असून जवळपास 11 हजार पुणेकरांनी आपला “फिडबॅक’ दिला आहे. त्यामुळे नागरी सहभागात पुणे शहर पाचव्या क्रमांकावर पोहचले आहे. उर्वरित दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी “फिडबॅक’ दिल्यास पुणे देशातील स्वच्छ शहरात पहिला क्रमांकही मिळवू शकणार आहे. त्यामुळे जास्तातील जास्त पुणेकरांनी “फिडबॅक’ द्यावा.
– ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन.