महाबळेश्वर – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी स्थापन करुन भाजपचा पत्ता ज्या प्रकारे कट केला. त्याच पद्धतीने महाबळेश्वर पालिकेच्या विषय समिती निवडीदरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी करत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली होती.
आता पुढील सर्वसाधारण सभेतही हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी करुन सत्ताधारी भाजपची कोंडी करणार की सत्ताधारी गटाच्या वळचणीला बांधले जाणार? याकडे आता शहराचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना प्रणित आघाडीचा पराभव करून पालिकेची सत्ता हस्तगत केली.
राष्ट्रवादी विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच त्यांना नगराध्यक्षांनी धक्का दिला व त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला महाबळेश्वर पालिका गमवावी लागली. असे असले तरी उपनगराध्यक्षपद पदरात पाडुन भाजपबरोबर राष्ट्रवादीने पालिकेत सत्तेत राहणे पसंत केले.
शिवसेना समर्थक आघाडी पालिकेत विरोधी बाकावर बसली. पालिकेत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती होती तरीदेखील नगराध्यक्षांचे पती व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नगरसेवक नाराजी व्यक्त करीत होते. अशातच राज्यात भाजपला बाजुला करून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येवून महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला गेला व महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली.
आता या प्रयोगाची चाचणी राज्यातील अनेक शहरातून सुरू झाली आहे असाच प्रयोग महाबळेश्वर पालिकेतदेखील करण्यात आला. या प्रयोगासाठी पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्र येवून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी सुरू केली आहे. ही खेळी नुकतीच यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेत विविध विषय समितीच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी समर्थक व शिवसेना समर्थक नगरसेवकांनी निवडणुकीच्या सभेवर बहिष्कार टाकला.
त्यामुळे प्रशासनाला ही सभा रद्द करणे भाग पडले. महाविकास आघाडीला पालिकेत चांगलेच यश मिळाल्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढला असून ही एकी यापुढे अशीच कायम ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने केला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे येणारी सर्वसाधारण सभा महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळे चांगलीच गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत.