अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

ऐतिहासिक शिलालेख सापडला
शहर विकास विभागाने आज धडाडी दाखवत मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कोठेही बोटचेपेपणा न दाखवल्याने ग्रेड सेपरेटरच्या सेवा रस्त्याची जागा मोकळी करण्यात आली. अतिक्रमित बांधकामे तोडताना नाक्‍यावरील पिंपळाच्या पाराचा जमिनीत दबलेला भाग उघडा पडला. या पाराचे बांधकाम 1852 सालात श्रीमंत शहाजीराजे यांनी केल्याची माहिती देणारा शिलालेख उघडा झाला. त्यावर अन्नछत्र अशी नोंद आढळून आली. हा धडधडीत पुरावा प्रकाशात आल्याने कथित “कर्मवीर पारा’च्या दाव्याचा फुगा आपोआप फुटला आहे.

सातारा – ग्रेड सेपरेटरच्या कामातील पोवई नाका ते शाहू चौक या रस्त्याचे काम गतीने होत असल्याने पालिकेच्या शहर विकास विभागाने पोवई नाक्‍यावरील अतिक्रमणांवर मंगळवारी हातोडा टाकला. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य इमारतीसमोरील सयाजी हायस्कूलच्या मैदानालगतचे विक्रम बापू माने (166, रविवार पेठ) यांचे पत्र्याचे शेड काढून टाकण्यात आले.

त्याचबरोबर अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून तयार केलेले कट्टे व फशराही उखडून टाकण्यात आल्या. ही कारवाई सुरू असताना अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नागरिक व महिलांसोबत प्रचंड वादावादी झाली.
आधी बड्यांची अतिक्रमणे काढा, मग आमचे बघू, असे म्हणत काही जणांनी गोंधळ घातला. मात्र, पोलीस फौजफाटा आल्यावर मोहिमेला गती आली. मोहिमेला विरोध करणारे घटनास्थळावरून गायब झाले. मेळवणे कोल्ड्रिक्‍स, कबाडी पावभाजी या दोन व्यावसायिकांचे फरशी बांधकाम, बालाजी प्राईड या इमारतीच्या पार्किंग रॅम्पचा काही भाग तोडण्यात आला. ग्रेड सेपरेटरच्या पुलाच्या भिंतीपासून आठ मीटरचा सेवा रस्ता प्रायोजित आहे.

या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली होती. 166, रविवार पेठ येथील अतिक्रमणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. शॉपिंग कॉम्प्लेक्‍सच्या जागी विक्रम माने यांनी उभारलेले शेड वादग्रस्त होते. अतिक्रमण विरोधी पथकाचे निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांच्यासह कर्मचारी सकाळी सव्वाअकरा वाजता घटनास्थळी आले. त्यावेळी काही महिला व नागरिकांनी पालिकेच्या पथकाशी हुज्जत घातली.

महिला तावातावाने भांडायला लागल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर निकम व अष्टेकर यांनी पोलीस बंदोबस्त मागवून धडक कारवाई सुरू केली. त्यामुळे फुकटची जागा लाटणाऱ्यांची तंतरली. जेसीबीच्या साह्याने शेड काढायला सुरुवात करताच पळापळ सुरू झाली. पालिकेने पत्र्याचे शेड, आईस्क्रम व पाव भाजी विक्रेत्याने टाकलेल्या फरशा उखडून काढल्या. पोलीस बंदोबस्त असल्याने कोणी “ब्र’ शब्दही उच्चारला नाही. धडाधड अतिक्रमणे काढून पालिकेच्या पथकाने आठ मीटर सेवा रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.