महापालिकेच्या स्वागतमंचावर कार्यकर्त्यांचा ताबा

सुरक्षारक्षकांचा ढिसाळ कारभार : महापालिकेचा माईकही केला “हायजॅक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनानिमित्त चापेकर चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपात लोकप्रतिनिधी ऐवजी कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसून आली. येथील मंडपाच्या पहिल्या रांगेत लोकप्रतिनिधी ऐवजी कार्यकर्तेच तोरा मिरवतांना दिसले. याची सर्वस्वी जबाबदारी असलेले महापालिकेचे सुरक्षा रक्षक या कार्यकर्त्यांपुढे हतबल झाल्याचे दिसले. कार्यकर्त्यांनी थेट मंडपावरील खुर्च्यांचा ताबा घेतला. मंडपावर कोणीही शिरु नये, यासाठी ठेवण्यात आलेल्या महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचे यावर कुठलेही नियंत्रण नव्हते.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपला मोठेपणा दाखविण्यासाठी या मंडपाचा आधार घेतला. या मंडपात महापौरांनी काही वेळ हजेरी लावल्यानंतर परिसरातील लोकप्रतिनिधीचा तोरा मिरवणारे दोघे-तिघेजण कार्यकर्त्यांसह मंडपात आले. तेथील पहिल्या रांगेतील खुर्च्यांवर ताबा मिळविला. कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा वाढला होता की, एवढ्यावर न थांबता महापालिकेचा माईकवर ताबा मिळवत हौस पूर्ण करुन घेतली.

त्यांचा हा प्रकार पाहून अधिकाऱ्यांनी मागील रांगेतील खुर्च्यांवर जाऊन आपली जागा पकडली. मात्र, काही वेळांनी महिला नगरसेवकांच्या समवेत आलेल्या काही महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांना तिथूनही उठावे लागले. यावेळी मंडपाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. सुरक्षा रक्षकांची हतबलता इतकी वाढली की अखेर एका अधिकाऱ्याने व सुरक्षा रक्षकांनी मंडपातून काढता पाय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)