पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ऐन दिवाळीची लगबग सुरू असतानाच महापालिका प्रशासनाकडून येत्या गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरात एकाच वेळी पालिकेच्या सर्वच्या सर्व व जलकेंद्रे, टाक्यांच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
दिवाळीसाठी नागरिकांकडून घरांची स्वच्छता सुरू करण्याची लगबग सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना गुरुवारी सुटी असतानाच महापालिकेकडून पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांची सणासुदीत चांगलीच कोंडी होणार आहे.
त्यातच एक दिवस पाणी बंद ठेवण्यात आल्यानंतर पुढे तीन ते चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यास लागतात. त्यामुळे ऐन दिवाळीत पाणी बंद नको, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ही जलकेंद्रे राहणार बंद
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खडकवासला जॅकवेल, पर्वती नवे व जुने जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र , वारजे जलकेंद्र,
चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुशृंगी टाकी, कोंढवे- धावडे टाकी व त्यावर अवलंबून परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पाणी बंद असणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने घराची सफाई, तसेच स्वच्छता सुरू आहे. आमच्या भागात पाणी बंद ठेवल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यास पुढे तीन ते चार दिवस लागतात.
त्यामुळे महापालिकेने दिवाळीच्या आधी पाणी बंद ठेवण्याऐवजी दिवाळीनंतर पाणी बंद ठेवावे. नागरिकांची गैरसोय करू नये. – अभिजित पाटील (खराडी)