जमा-खर्च भागविण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
सांस्कृतिक क्षेत्रातून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता
पुणे – महापालिकेने शहरात उभारलेल्या नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात सुमारे 14 नाट्यगृहे असून त्यातील केवळ चारच नाट्यगृहांमध्ये वर्षभर नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र, त्याचवेळी सर्वच नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनास खर्च करावा लागतो. त्यामुळे ही नाट्यगृहे निविदा प्रक्रिया राबवून वर्षभरासाठी चालविण्यास दिली जाणार आहेत. त्यासाठी सांस्कृतिक विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आहेत.
महापालिकेकडून शहरात सुमारे 14 सांस्कृतिक केंद्रे उभारली आहेत. मात्र, त्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, गणेश कला व क्रीडा मंच ही चार केंद्र वगळता इतर कोणत्याही केंद्रांना वर्षभर नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी आवश्यक असलेला प्रतिसाद मिळत नाही. मात्र, त्याचवेळी या नाट्यगृहांची देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छतेवर प्रशासनास मोठ्या प्रमाणात खर्चाचा भार उचलावा लागतो.
ही बाब लक्षात घेऊन प्रमुख नाट्यगृहे वगळता उर्वरीत नाट्यगृहे तसेच कलादालने खासगी संस्थांना चालविण्यास देण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागास याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आहेत. मात्र, या खासगीकरणाच्या निर्णयाला सांस्कृतिक क्षेत्रातून मोठा विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.