शिक्षक सर्वेक्षणात गुंतल्याने ऑनलाइन वर्ग सुरू होईनात
पुणे – महापालिका शाळांचे ऑनलाइन वर्ग अद्याप सुरू होण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. 15 जून रोजी या शाळा सुरू होणार होत्या.
महापालिका शाळांमध्ये सुमारे 92 हजार 740 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील 70 हजार 139 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आयडी महापालिका शिक्षणमंडळाने उघडले आहेत. तसेच त्यांच्या पालकांच्या मोबाइलवर ते पाठवले असून, त्यांना ऍप डाऊनलोड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ही सगळी तयारी करूनही ऑनलाइन शाळा अजूनही सुरू होऊ शकली नाही.
वास्तविक अन्य खासगी शाळांबरोबरच महापालिकेच्याही शाळा सुरू करण्याचे प्लॅनिंग होते. रोजच्या शाळेच्या वेळेतच ही शाळादेखील भरवण्यात येणार होती. त्याच दृष्टीने पुस्तक वाटप आणि अन्य विषयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या सगळ्या गोष्टींची पूर्तता होऊन शाळा सुरू करण्याचे शिक्षण मंडळाचे प्लॅनिंग मात्र फिसकटले आहे. सद्यस्थितीत पुस्तके आणि वह्या या अत्यावश्यक गोष्टी दिल्या जाणार होत्या. पूर्णवेळ विद्यार्थ्यांसह शाळा सुरू झाल्यानंतर साहित्य पुरवले जाणार होते.
परगावी गेलेली मुले परतलीच नाहीत
अनेक मजूर, कामगार गावी गेल्याने शाळांमध्ये मुलांची पटसंख्या कमी नोंदवली गेली. मात्र, हा वर्ग अजूनही परतला नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय करायचे, हा प्रश्न आहे. मात्र, हे दूरस्थ शिक्षणासारखे असल्याने ते असतील तेथून ऑनलाइन शाळा होऊ शकते. मात्र, तसे होते का हे तपासण्याचे कोणतेही साधन शिक्षणमंडळाकडे नाही. मुळात विद्यार्थ्यांसह शाळा सुरू झाल्यानंतरच या वर्षीची पटसंख्या समजू शकणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.
महापालिका शाळांमधील शिक्षकांना कोविडच्या सर्वेक्षणाचे काम लावल्याने त्यांना शाळेचे सत्र घेणे शक्य नव्हते. प्रत्येक शिक्षकांना दीड हजार घरे याप्रमाणे
सर्वेक्षण अनिवार्य होते. ज्यांचे एवढे सर्वेक्षण झाले, त्यांना परतण्याची मुभा होती. सध्या सुमारे 950 शिक्षकांना या सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त केले आहे, ते आता त्यांचे शाळेचे काम करू शकतात. त्यामुळे त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. आता ते का सुरू होत नाहीत, हा दुसरा मुद्दा आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्त, मनपा