राजकारणातून निधीच नाही : पाच वर्षांपासून काम रेंगाळले
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – कोंढवा रस्त्यावरील सर्वे नंबर 18, 19 व 20 (पार्ट) येथिल ऍमेनिटी स्पेसच्या आरक्षित जागेवरील ई-लर्निंग स्कूलचे काम गेल्या पाच वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. दि. 26 जानेवारी 2016 रोजी या इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. परंतु, पाच वर्षे उलटूनही इमारतीचे काम अर्धवट संथगतीने सुरू आहे. पालिकेतील सत्तांतरातून या इमारतीसाठी निधीच दिला जात नसल्याची चर्चा आहे.
ई-लर्निंग स्कूलसाठी तत्कालीन नगरसेविका भारती कदम यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाली होती. हा भाग जुन्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक 76 मध्ये होता. परंतु, बदलत्या रचनेनुसार हा भाग बदलून प्रभाग क्रमांक 41 मध्ये गेला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार पार्किंग, अप्पर पार्किंग आणि वर पाच मजले अशाप्रकारे या इमारतीचे काम होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात पहिल्या फेजमध्ये बेसमेंट पार्किंग, अप्पर पार्किंग आणि वर तीन मजले असा सांगाडा उभारण्यात आला आहे.
एकूण आराखड्यानुसार गेल्या पाच वर्षांत आतापर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ आरसीसी काम झाले असून तीन मजल्यांचेही फ्लोरिंग, प्लास्टर, खिडक्या, रंगरंगोटी, वीज व इतर किरकोळ कामे रेंगाळली आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अर्धवट इमारतीचा उपयोग अनेक जण गाड्यांच्या पार्किंगसाठी तसेच रात्रीच्या वेळी मद्यापींकडून “बार’ म्हणून केला जात आहे. इमारतीचा तळमजल्यातील पार्किंगमध्ये पाणी साचले आहे.
पुणे मनपाचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. प्राधान्यक्रमाने कामे सुरू असून दरवर्षी प्राधान्यक्रम बदलत आहे. करोना काळामध्ये निधीमध्ये 40 टक्के कपात तसेच निधी कपातीमुळे बांधकाम किंवा प्रकल्पांना निधी अपुरा पडत आहे. निधी मिळाल्यावर ई-लर्निंगचे स्कूल इमारतीचे काम पूर्ण केले जाईल.
– शिवाजी लंके, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे मनपा
ई-लर्निंग स्कूल इमारतीचा सांगाडा उभा आहे. तळमजल्यावरील डक्टमध्ये अनेक दिवसांपासून पाणी साचून त्यामध्ये डास व दुर्गंधीमुळे सोसायट्यांतील नागरिकांन त्रास होत आहे. याचबरोबर या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी बेकायदा कामेदेखील होत आहे. इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी.
– मन्सुर मुजावर, स्थानिक नागरिक
2016 मध्ये नगरसेविका भारती प्रकाश कदम यांच्या जुन्या 76 प्रभाग येथे या ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, कामही सुरू केले. मात्र, नंतरच्या निवडणुकीमध्ये प्रभाग विभागणीनंतर दुसऱ्या प्रभागांमध्ये हा भाग गेला. तरीही आयुक्तांमार्फत खात्याकडून प्रभाग क्रमांक 76च्या नावाने बजेट देण्यात आले होते. निधीही मिळाले. त्यामार्फत आतापर्यंतचे हे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यानंतर त्या ठिकाणी ती इमारत अजूनही पूर्ण करण्यास सभासद अपयशी ठरले आहेत. शिवाय ही इमारत पूर्ण व्हावी, असा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही.
– प्रकाश कदम, नगरसेवक, पुणे मनपा