महापालिकेची दालने पडली ओस

कामकाज थंडावले : 835 अधिकारी, कर्मचाऱ्यांना “इलेक्‍शन ड्यूटी’ 

पिंपरी  – महापालिकेतील सुमारे 835 अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज थंडावले आहे. त्यात आचारसंहितेमुळे अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदारांनीही महापालिकेकडे पाठ फिरविल्याने सर्वच दालने ओस पडली आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दहा दिवस उलटले आहेत. पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते पालिका व क्षेत्रीय कार्यालयात फिरकेनासे झाले आहेत. परिणामी, पालिकेत व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. निवडणूक विभागाच्या विविध कक्षाचे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे दिल्या जातात. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे पत्रही दिले गेले आहेत.

आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत या अत्यावश्‍यक विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि सर्व विभाग प्रमुखांना वगळून उर्वरित 4 हजार अधिकारी व कर्मचारी निवडणुक विभागाच्या कामासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास पालिकेने कळविले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने 835 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीसाठी नियुक्‍त्या केल्या आहेत. त्यात चिंचवड मतदार संघासाठी 284, पिंपरी विधानसभेसाठी 262 आणि भोसरीसाठी 285 आणि जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 4 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीचा निकाल 24 ऑक्‍टोबरला आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. परिणामी, नोव्हेंबर महिन्यापासून महापालिकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.