पुणे : देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याला पहिल्या पाच मध्ये ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू असतानाच; शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला महापालिकाच खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला एखाद्या नागरिकाने अथवा व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला, पदपथावर अनधिकृत शेड अथवा बांधकाम केले असल्यास जेसीबी लावून कारवाईचा आव आणणाऱ्या अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाकडून रस्त्यावर लावलेल्या मोठमोठया बॅनरचे फक्त फ्लेक्स काढले जात असून बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहीराती लावण्यासाठी तसाच ठेवला जात आहे. ही बांबू न तोडण्यासाठी या दोन्ही विभागांचे “तोडपाणी’ सुरू असल्यानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
बांबूला हात न लावण्यासाठी “तोडपाणी’
नगरसेवकांची मुदत संपून शहरात प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे, पदपथवरील फ्लेक्स, बोर्ड बॅनर्स, साईड मार्जिंन मधील बांधकामे काढण्याचे आदेश दिले आहे. अतिक्रमण विभागाने या कारवाईसाठी पुढाकार घेतला असून इतर सर्व विभागांना सोबत घेऊन हे काम केले जाते. ही कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्स काढतात.
फ्लेक्ससाठी लावलेला बांबूचा सांगाडयाला हे कर्मचारी हातही लावत नाही. त्यामुळे, सरळ सरळ हे बांबू संबधितांसाठी आहे तसेच सोडून दिले जातात. प्रत्यक्षात हे बांबू मोडल्यास अथवा जप्त केल्यास सांगाडयासाठी बांबू देणारे अनधिकृत फ्लेक्ससाठी बांबू देणार नाहीत. मात्र, सांगाडे उभारणांशी “तोडपाणी’होत असल्यानेच ही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
दुर्घटनेची भिती..
अशा प्रकारे लावण्यात आलेल्या सांगाड्यांमुळे दुर्घटनेचीही शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक सांगाडयांना लोखंडी ग्रीलचा सपोर्ट द्यावा लागतो. तसेच त्याला मोठया लोखंडी शिडयाही असताता. हे सांगाडे उभारताना त्याचे कोणतेही स्ट्रक्चल ऑडिट होत नाही. त्यामुळे, हे सांगाडयांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.