पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येत्या 15 ऑगस्ट 2022 पासून वर्ग 1 आणि वर्ग 2 मधील अधिकारी याची सुरुवात करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिष्टमंडळाने नुकताच गुजरात राज्यातील सुरत महानगरपालिकेचा अभ्यास दौरा केला. सुरत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी गणवेषात असतात. गणवेषाबाबतचे त्यांचे मत आणि महत्त्व या अभ्यासदौऱ्या दरम्यान शिष्टमंडळाने जाणून घेतले. गणवेषामुळे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची जनमानसांत वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शिष्टमंडळामध्ये उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप तसेच महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळाने केलेल्या अभ्यास दौऱ्याची माहिती आयुक्त पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी विभागप्रमुखांसह सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. सर्वांना गणवेषाची संकल्पना आवडली. सुरत महापालिकेच्या धर्तीवर सर्वांच्या सहमतीने महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय आयुक्त पाटील यांनी घेतला.
वेगळी ओळ्ख निर्माण होण्याबरोबरच कामाची शिस्त वाढून दैनंदिन कामकाजास गती मिळते. या दृष्टीकोनातून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वर्गनिहाय ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. निश्चित केलेल्या ड्रेसकोडनुसार अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर राहणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी करणार आहेत.