मुंबई – करोनाच्या गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयांनी नाकारू नये आणि मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या 80 टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
प्रत्येक बेडला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना यापूढे उपचार मिळणार, प्रयोगशाळाना 24 तासात चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 19 दिवसांवर गेला आहे. कोविड योद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत. 3750 डॉक्टर उपचारांसाठी उतरत आहेत. 450 डॉक्टर्स पैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे . मुंबईत सध्या 21 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत असे पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी यांनी सांगितले.
राज्यातील 30 ते 40 वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40 टक्के तर 40 ते 50 वयोगटात ते 18 टक्के आहे. 50 ते 60 वयोगटात ते 16.5 टक्के आहे. मृत्यू पावलेल्या 32 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. 67 टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के तर ठाण्यात 36.59 टक्के आहे.
महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 4.5 लक्ष चाचण्या झाल्या आहेत. राज्यात 3631 चाचण्या दर दश लक्ष झाल्या असून देशात 2621 चाचण्या होतात. केवळ आंध्र आणि तामिळनाडू राज्यांत आपल्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.
पूर्वी राज्यात एकूण झालेल्या चाचण्यांपैकी 18 टक्के पॉझिटिव्ह होत होते आता ते कमी होऊन 15.5 टक्के झाले आहे. सध्या राज्यात केवळ 1400 रुग्ण गंभीर आहेत अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.