महापालिकेच्या गैरनियोजनाचाच ‘महापूर’

महापालिका-पाटबंधारे विभागात समन्वयाचाही अभाव


पूरग्रस्त भागांची केलेली स्वच्छता “पाण्यात’

पुणे – महापालिका आणि पाटबंधारे विभागातील समन्वयाअभावी तब्बल 10 हजार नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. धरणे 100 टक्के भरली; तसेच हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊनही नियोजन न झाल्याने शहरातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पूर ओसरल्यानंतर बुधवारी अनेक नागरिक घरी परतत होते. त्याचवेळी पूरग्रस्त भागात पालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली असतानाच बुधवारी रात्रीपासून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे पुन्हा आयत्यावेळी घर सोडण्याची वेळ आली आहे.

रविवार दुपारपासून मुळा आणि मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात शनिवारी रात्रीच धरणसाखळीत 98 टक्के साठा झाला. सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज होता. सुमारे 35 हजार क्‍युसेकपेक्षा अधिक पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती उद्‌भवते. ही बाब लक्षात घेऊन शनिवारी रात्रीपासून विसर्ग 30 हजारपेक्षा कमी ठेऊन विसर्ग करणे आवश्‍यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवार दुपारपासून 35 हजार आणि नंतर हा विसर्ग 45 हजार करण्यात आला. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने हाच विसर्ग कायम ठेवण्यात आला. त्यामुळे 800 हून अधिक कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. मंगळवारी सकाळी धरणे 100 टक्के भरलेली तसेच अतिवृष्टीचा इशारा असतानाही विसर्ग कमी करत तो 18 हजार क्‍युसेक करण्यात आला. त्यामुळे पूरस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्थलांतरितांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. तर महापालिकेनेही पूरग्रस्त परिसराची स्वच्छता, औषध फवारणी केली. मात्र, मंगळवारी रात्री पुन्हा विसर्ग 27 हजार करण्यात आला. तर बुधवारी रात्री पुन्हा हा विसर्ग 35 हजार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा घर सोडण्याची वेळ आली असून महापालिकेने बुधवारी दिवसभर केलेली स्वच्छता मोहीम पाण्यात गेली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच रजेवर
शहरात पूरस्थिती असतानाच, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना प्रकृतीच्या कारणास्तव रविवारपासूनच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम नवनियुक्‍त उपायुक्‍त सुनील इंदलकर यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून पाटबंधारे विभागाशी पाण्याबाबत समन्वय ठेवण्यात येत आहे. मात्र, विसर्ग कमी अथवा, जास्त याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून अचानक घेतला जात असताना पालिका अधिकाऱ्यांचा गोंधळ होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.