सातारा -नगराध्यक्षांना अंधारात ठेऊन सानुग्रह अनुदानाचे पत्र कामगार संघटनांना परस्पर दिल्याचे प्रकरण ताजे असताना शहरातील 318 गाळेधारकांना भाडेवाढीच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. कोविडच्या काळात व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला असताना गाळ्यांच्या भाड्यांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहराच्या हद्दवाढीनंतर खा. उदयनराजे भोसले हे नव्याने राजकीय मोट बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना पालिकेत वादांना आमंत्रण देणाऱ्या कामांची मालिका सुरू आहे. सानुग्रह अनुदानासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी केलेला लेखी खुलासा, पालिकेतील बिगारी कम लिपिक अनुराधा गोडबोले यांच्या सेवा कालावधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांना लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग, आरोग्य विभागाच्या अंदाजपत्रकावर व्यक्त होणारा संशय, या प्रकरणांमध्ये पालिकेत पडद्याआड गोंधळ सुरू आहे. त्यात 318 गाळेधारकांना दुप्पट भाडेवाढीच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत.
कोविडमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या व्यावसायिकांचे डोळे या भाडेवाढीच्या नोटिसांनी पांढरे व्हायची वेळ आली आहे. पालिकेच्या दहा व्यापारी संकुलांमध्ये 318 गाळे आहेत. त्यात सदरबझार शॉपिंग सेंटरमध्ये 80, सदाशिव पेठेतील सुमित्राराजे भोसले व्यापारी संकुलात 41, भवानी पेठेतील अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलात 33, केसरकर पेठेतील व्यापारी संकुलात 29, प्रतापसिंहराजे भोसले संकुलात 27, शनिवार पेठ मच्छी मार्केटमध्ये 24 गाळे आहेत. या संकुलांमधील गाळ्यांची भाडेवाढ राजकीय दबावामुळे बराच काळ प्रलंबित आहे. यापैकी सात व्यापारी संकुलांमधील गाळ्यांच्या भाड्यात 2011 मध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आली होती.
या गाळेधारकांचे करार 2017-19 या काळात संपले असताना 15 टक्के भाडेवाढीच्या आणि स्थायी निर्देश 24 प्रमाणे भाडेवाढ दुप्पट करण्याच्या नियमावर पालिका प्रशासनाने बोट ठेवले आहे; परंतु नेमकी करोना संक्रमणाच्या काळात भाडेवाढीच्या नोटिसा मिळाल्याने हवालदिल झालेल्या व्यावसायिकांनी उपनगराध्यक्ष व संबंधित प्रभागांमधील नगरसेवकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
नियमाप्रमाणे होणारी भाडेवाढ सर्वांना मान्य आहे; परंतु स्थायी निर्देश 24 हा 2005 चा असताना, गेल्या पंधरा वर्षांत करारांची मुदत संपलेले किती गाळे पालिकेने ताब्यात घेतले? किती गाळ्यांचे भाडे पंधरा टक्के वाढीने वसूल केले, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. राजकीय दबावातून भाडेवसुली प्रलंबित ठेवण्यात आली. पालिका कार्यालय इमारतीच्या आवारात असणारे मंगल कार्यालय ठेक्याची मुदत संपूनही ठेकेदार असलेल्या माजी नगराध्यक्षाच्या ताब्यात आहे. भाडेवाढीच्या मुद्द्यावरून नवा वाद उद्भवला आहे.
कोविड संक्रमणाच्या काळात सातारकरांना घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याची सूचना खा. उदयनराजे यांनी केली होती, तरीही नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची स्वतंत्र बिले पाठवण्यात आली. शहराच्या आर्थिक उलाढालीवर गेले सात महिने परिणाम झाला आहे. त्यात भाडेवाढीच्या