विश्रांतवाडी – “करोना पॉझिटिव्ह’ आलेल्या एका व्यक्तीने खासगी लॅबमध्ये अनोळखी व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला. त्यामुळे करोना संसर्ग नसतानाही या मोबाइलधारकाला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धानोरीच्या भैरवनगरमध्ये राहणाऱ्या विजय महाजन यांच्यावर हा प्रसंग आला आहे. त्यांनी सांगितले, “मी ठणठणीत असल्याने करोनाची कुठलीही चाचणी केलेली नाही. मात्र 2-3 दिवसांपासून पुणे मनपा आणि वैद्यकीय विभागाकडून “तुम्ही करोना पॉझिटिव्ह असून पुढील उपचार घ्यावेत,’ असे सांगण्यात येत आहे.
महाजन यांनी चौकशी केली असता, येवलेवाडीतील सय्यद निशाद या व्यक्तीने बावधनमध्ये एका खासगी लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली असून, तो करोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, सय्यदने स्वतःऐवजी महाजन यांचा मोबाइल क्रमांक आणि पत्ताही चुकीचा दिला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सय्यदने दिलेल्या पत्त्यावर पाहणी केली असता, तो तेथे राहत नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, महाजन यांना संबंधित विभागाकडून सातत्याने फोन येत आहेत. महाजन यांनी आपण ती व्यक्ती नसल्याचे सांगूनही त्यांना अनेकवेळा फोन येत आहेत. महाजन यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. आता आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे महाजन म्हणाले.
आधार कार्ड पाहूनच टेस्ट करा
ज्याला करोना झाला आहे, तो सय्यद निशाद करोनाचा फैलाव करू शकतो. त्यामुळे करोनाची चाचणी करताना संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड अथवा मोबाइलवर “ओटीपी’ पाठवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे मत विजय महाजन यांनी व्यक्त केले आहे.
वैद्यकीय अधिकारी म्हणतात..
याबाबत पालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणाले, “करोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा शोध न लागल्याने यामध्ये आम्हाला काहीच करता येणार नाही. महाजन यांना काही काळ स्पष्टीकरण देण्याचा त्रास सहन करावा लागेल, त्यानंतर फोन येणे बंद होईल.’