पुणे : शहरात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. महापालिकेकडून साफसफाई केल्यानंतरही वारंवार हे प्रकार घडत शहरात रस्ते, मोकळ्या जागा, दुभाजक, पादचारी मार्ग यांसह अन्य ठिकाणी कचरा पडलेला असतो. अस्वच्छता असते; पण तेथे व्यवस्थित स्वच्छता न झाल्याने शहरभर कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरणार असून, एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे.
परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबर या कालावधी ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. याबाबत नुकतीच त्यांनी १५ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग, विद्युत, उद्यान, पथ, मलनिःसारण यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही स्वच्छता केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागच नाही, तर या बैठकीस उपस्थित असलेले सर्व विभागांचे कर्मचारी करणार आहेत. अशाच प्रकारे शहरातील इतर भागांतही ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
एकाच वेळी सर्व विभागांची कारवाई
शहरातील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी पुणे महापालिकेची आहे. मात्र, त्याच वेळी झोपडपट्टी, लगतचे रस्ते स्वच्छ करणे, रस्त्यावरील माती उचल भित्तिपत्रक, दुभाजकातील वाढलेले गवत, शहरात लावलेल्या जाहिराती, रस्त्यावर बंद पडलेली व बेवारस वाहने, डासांची ठिकाणे, वाढलेली झाडे, पावसाळी गटारे, सांडपाणी, याबाबत संबधित विभागांनी काम करणे आवश्यक आहे. मात्र, हे विभाग ही जबाबदारी एकमेकांवर टोलवत असतात. त्यामुळे या सर्व विभागांना एकाच वेळी एकाच प्रभागात घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले.