सत्ताधाऱ्यांसाठी सुरक्षेचे नियम धाब्यावर; भाजपच्या बैठकीसाठी खानसाम्याने जिन्यांवरच जमवली “भट्टी’
पुणे – भाजपच्या बैठकीसाठी सोमवारी महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीच्या जिन्यातच खानसाम्याने भट्टी जमवली आणि खमंग थालिपिठ तयार केले. मात्र, यामध्ये सुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसवत सदस्यांनी या थालिपिठाचा मस्त आस्वाद घेतला.
सत्ताधारी असलेल्या भाजपची बैठक सोमवारी नव्या विस्तारीत इमारतीत सभागृहनेत्याच्या कार्यालयात होती. त्यासाठी खास थालिपिठाचा बेत होता. एरव्ही तयार पदार्थ आणून ते सदस्यांना दिले जातात. मात्र, यावेळी खानसाम्याला थेट महापालिका भवनातच भट्टी जमवायला लावली. त्याने गॅस सिलिंडर, तवे असा सगळा जामानिमा जमा केला. आता ही भट्टी लावायची कोठे? हा प्रश्न पडल्याने, त्याला जिन्याची जागा सुचवण्यात आली. त्याने तेथेच भट्टी पेटवत गरम थालिपिठं “सर्व्ह’ केली.
एरव्ही, अनधिकृतपणे सिलिंडर बाळगणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी पदार्थ बनवून विकणाऱ्या व्यावसायिकांवर तत्परतेने कारवाई केली जाते. मात्र “दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे महापालिका भवनातच हे नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार दिसून आला. मोकळ्या आवारात जर हा प्रकार झाला असता, तर ही गोष्ट समजून घेण्याची होती. मात्र, बंदिस्त जागेत हा प्रकार झाल्याने आणि त्या मजल्यावर धूर पसरल्याने प्रत्येकजण डोकावून जात होता.
याबाबत विचारले असता, “या इमारतीतील “पॅन्ट्री’ ही चौथ्या मजल्यावर आहे. त्यातून ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता हे बनवणार कोठे? त्यामुळे त्यांना जिन्यामध्ये बनवण्याविषयी सांगण्यात आल्याचे’, एका पदाधिकाऱ्याच्या “पीए’ ने सांगितले. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि “व्हरायटी फूड’ खाण्यासाठी महापालिका भवनाच्या इमारतीलाच या सदस्यांनी गॅसवर ठेवल्याचे हे उदाहरण बहुदा प्रथमच घडले असावे.
“टेक इट इझी’…
पालिकेच्या जिन्यावर गॅस लावण्यासाठी कोणतीच परवानगी काढण्यात आली नव्हती. तसेच या घटनेला “टेक इट इझी’ या प्रकाराने घेण्यात आले आहे. वास्तविक यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, मालमत्ता व्यवस्थापन किंवा भवन या कोणत्याच विभागाला याची कल्पना देण्यात आली नव्हती.