- फौजदारी गन्हा दाखल करण्याची मोरेश्वर भोंडवे यांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने खरेदी केलेल्या शालेय वह्या व पुस्तकांचा पुरवठा न करताच कोट्यवधींचे बिले उकळण्यात आली असून या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा शिक्षण समितीचे सदस्य मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन भोंडवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविले आहे. भोंडवे यांनी दिलेल्या पत्रात अतिशय गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. या पत्रात म्हटले आहे की, शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके व वह्यांची खरेदी करण्यात आली आहे. थेट पद्धतीने करण्यात आलेल्या खरेदीसाठी ठेकेदारांना आदेश देण्यात आला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने साहित्य न पुरविताच पुरवठा केल्याची चलने माध्यमिक विभागाकडे सादर केली आहेत.
या चलनाच्या आधारे संबंधितांना पन्नास टक्के बिल हे 31 मार्च रोजीच अदा करण्यात आलेले आहे. साहित्य न पुरविता ठेकेदाराने महापालिकेकडून पैसे उकळून महापालिकेची फसवणूक केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यातून ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व लेखी खुलासा शिक्षण समितीसमोर सादर करावा, अशी मागणीही भोंडवे यांनी या पत्राद्वारे केली आहे.