निर्णयातून “ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांना वगळले
पुणे – शहरात लॉकडाऊन असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनाही मार्चचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली.
ऐन मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊनची स्थिती आल्याने राज्यातील खासगी अस्थापना तसेच व्यावसाय बंद आहेत. परिणामी राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारे उत्पन्न लक्षणीय घटले आहे. तर लॉकडाऊन आणि करोनाच्या प्रसारामुळे शासकीय कार्यालयातील उपस्थितीही केवळ 5 टक्के आहे. त्यातच, करोनाच्या उपाययोजनांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून या महिन्यात करण्यात आली आहे. महापालिकेचे तसेच शिक्षण विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे
20 हजार आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्गवारीनुसार, मार्चचे वेतन अदा केले जाणार आहे. त्यात वर्ग “अ’ आणि “ब’च्या कर्मचाऱ्यांना 1 ते 15 मार्च या 15 दिवसांचे (50 टक्के), वर्ग “क’च्या कर्मचाऱ्यांना 1 ते 24 मार्च या दिवसांचे (75 टक्के) तर, वर्ग “ड’ च्या कर्मचाऱ्यांना 1 ते 31 मार्च (10 टक्के) वेतन अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
हप्ते होणार नाहीत “कट’
ज्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन देण्यात येणार आहे. त्यांनी संगणक, वाहन, घरबांधणी, भविष्य निर्वाह निधी कर्ज अथवा दिवाळी अग्रीम रक्कम घेतली असल्यास त्यांच्या पहिल्या टप्प्यातील वेतनातून ती कपात केली जाणार नाही. तसेच, भविष्य निर्वाह निधीची रक्कमही दुसऱ्या टप्प्यातच वसूल केली जाणार आहे.