नाशिक – राज्यातील सर्वच पालिका प्रशासन नवीन व्हेरिएंटचा शहरात संसर्ग होऊ नये, याकरिता बारीक लक्ष ठेऊन आहेत. नाशिक महानगरपालिकाही मागील आठवड्यापासून चांगलीच दक्षता घेत आहे. नव्या व्हेरिएंटमुळे महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लांबण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे.याआधीच तीन प्रभाग पद्धत रचना, ओबीसी आरक्षण आणि निवडणुकीसंदर्भात न्यायालयात दाखल केलेली याचिका अशा विविध कारणांमुळे पालिका निवडणूक लांबणीवर जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती.
मात्र पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यातच करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
नाशिक शहरात अद्याप या विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशा वातावरणात आगामी पालिका निवडणुका घेण्याचा धोका प्रशासन पत्करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.