नगर, – मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कराच्या थकबाकी वाढ झाली आहे. चालू वर्षात अवघी २०.२२ टक्के म्हणजे ४८.५१ कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे कराची थकबाकी २१५ कोटींवर पोहचली आहे. परिणामी, शहरात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान मनपा आपल्या टार्गेटपासून कोसोदूर राहिल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
थकबाकी थकल्याने आर्थिक वर्षात आर्थिक वर्षात महापालिकेची कराची मागणी ६०.६३ कोटी रुपये असून २०२.९८ कोटी रुपयांची जुनी थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी २६३.५२ कोटींवर पोहचली. चालू वर्षात केवळ ४८.५१ कोटींची वसुली झाली आहे. यात २१.१६ कोटी रुपये थकीत रक्कम व २७.३० कोटी रुपये चालू वर्षाच्या मागणीची रक्कम आहे. महापालिका थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने नियमित कर भरणाऱ्यांची संख्याही घटत आहे. चालू वर्षात निम्म्याच मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.